जन्मादी स्थितीसी प्रतीत हरीची सत्ता असे या जगी
ज्याने वेद दिले जगास, पडतो तो मोह ज्ञानीजना ।
तेजी वारि तयात भूमि गमते तैसा जगी तो गमे
मायामुक्त स्वतेज सत्यरुप ते आम्ही मनी ध्यातसो ॥ १ ॥
या विश्वाचा जन्म परमात्म्यापासून होतो. हे विश्व त्याच्याच आधारावर चालते आणि त्याच्यातच नाहीसे होते. सर्व पदार्थांतील त्याच्या अस्तित्वावरून (अन्वय) तो विश्वाचे उपादान कारण आहे हे सिद्ध होते, तर या सर्वांहून तो वेगळा (व्यतिरेक) असल्यामुळे तोच निमित्तकारण आहे, याचा निश्चय होतो. (कारण) तो सर्व काही जाणणारा व स्वयंप्रकाश आहे. त्यानेच ज्ञानी ऋषींनाही अनाकलनीय वेद, सृष्टिनिर्मात्या विधात्याला केवळ संकल्पाने दिले. त्याने सत्त्वगुणरूप तेज, रजोगुणमय जल आणि तमोगुणात्मक पृथ्वी स्वतःपासूनच निर्माण केली, असे तैत्तिरीय श्रुती सांगते. तोच त्यांचे उपादान कारण असल्याने ती भूते सत्य वाटतात. (तरीही तो अद्वैतदृष्ट्या मायाजनित भ्रम होय.) जसे सूर्यप्रकाशावर मृगजळ, पाण्यावर काच (रूप मोती) किंवा काचरूप मातीवर पाणी वास्तविक नसूनही अधिष्ठानसत्तेमुळे सत्य वाटते, तसेच परमात्मसत्तेमुळे विश्व सत्य वाटते. (या ठिकाणी त्रिसर्ग म्हणजे सत्त्व-रज-तम हे तीन गुण किंवा पंचभूते, इंद्रिये व त्यांच्या अधिष्ठात्री देवता यांची निर्मितीही घेता येईल.) असे असूनही स्वतःच्या तेजाने जो अनन्य भक्तांच्या मनांतील मायेचा अंधार पूर्णपणे नाहीसा करतो, त्या एकमेवाद्वितीय परम सत्य परमात्म्याचे (माया निरासासाठी) आम्ही ध्यान करतो.
जो निष्कामचि संतधर्म कथिला निर्मत्सरी मोकळा
ज्यामध्ये कथिले शिवस्वरूप नी तापत्रयो नाशक ।
श्रीमद्भागवतो महामुनिकृती सायास अन्यो नको
पुण्यात्माधरिता मनात श्रवणा बंदी हृदीं ईश्वर ॥ २ ॥
महामुनिव्यास-निर्मित या श्रीमद्भागवतमहापुराणात मोक्षापर्यंत कोणतीही कामना नसलेल्या परमधर्माचे निरूपण केले आहे. यात शुद्ध अंतःकरण असणार्या सत्पुरुषांनी जाणण्यायोग्य मूळ परमात्म्याचे निरूपण केले आहे, ते आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक अशा तिन्ही तापांना मुळापासून नाहीसे करणारे असून परम कल्याण करणारे आहे. ज्यावेळी पुण्यवान पुरुष या शास्त्राच्या श्रवणाची इच्छा करतात, त्यावेळी भगवंत विनाविलंब त्यांच्या हृदयात स्थिर होतात, तर मग याखेरीज दुसरे साधन किंवा शास्त्र यांची काय गरज आहे ?
निगमकल्पतरुफळ पक्व हे
शुक मुखातुनिच जे द्रवले असे ।
सततही जन भाविक हो तुम्ही
रससमुद्रचि भागवता पिणे ॥ ३ ॥
भक्तिरस जाणणारे भक्तजनहो, हे श्रीमद्भागवत वेदरूपी कल्पवृक्षाचे पिकलेले फळ आहे. श्रीशुकदेवरूप पोपटाच्या मुखाचा संबंध आल्याने अमृतरसाने परिपूर्ण आहे. हा मूर्तिमान रस आहे. जोपर्यंत शरीरात प्राण आहे, तो पर्यंत किंवा मनाचा लय होईपर्यंत या दिव्य भागवतरसाचे पृथ्वीवर वारंवार पान करीत रहा.
नैमिष्यारण्य क्षेत्रात शौनकादी ऋषींनि त्या ।
स्वर्ग हेतू धरोनिया अनुष्ठानास मांडिले ।
हजार वर्ष जो चाले असा यज्ञचि मांडिला ॥ ४ ॥
भगवान विष्णू आणि देवता यांचे परम पुण्यमय ठिकाण असलेल्या नैमिषारण्यात एकदा शौनकादी ऋषींनी भगवत् प्राप्तीच्या इच्छेने एक हजार वर्षापर्यंत चालणार्या एका मोठ्या यज्ञाचे अनुष्ठान केले.
एकदा त्या उषःकाली संपता नित्यकर्म ते ।
आसनीं पूजिता सूता पुसला प्रश्न आदरे ॥ ५ ॥
एक दिवस या ऋषींनी प्रातःकाली अग्निहोमादिक नित्यकर्मे आटोपून सूतांचे पूजन केले आणि त्यांना एका उच्चासनावर बसवून मोठ्या आदराने प्रश्न केला.
इतिहास पुराणे नी सर्व शास्त्रे तुम्ही तसे ।
चांगली वाचिली तैसी व्याख्याही कथिली असे ॥ ६ ॥
ऋषी म्हणाले - सूत महोदय, आपण निष्पाप आहात. आपण सर्व इतिहास, पुराणे आणि धर्मशास्त्रांचे यथाशास्त्र अध्ययन केले आहे. तसेच त्यांचे चांगल्या तर्हेने निरूपणही केले आहे.
वेदवेत्त्यांमधे श्रेष्ठ भगवान् बादरायण ।
सगूण निर्गुणो तेची सर्व श्रेष्ठीत जाणते ॥ ७ ॥
त्यांच्या अनुग्रहा तुम्ही पात्र एकचि जाहला ।
गुरु ते गुप्तही सर्व शिष्यासी नित्य सांगती ॥ ८ ॥
वेद जाणणार्यामध्ये सर्वश्रेष्ठ असे भगवान बादरायण (व्यास) आणि भगवंतांच्या सगुण-निर्गुण स्वरूपाला जाणणार्या अन्य मुनिवरांनीही ज्या विषयांचे ज्ञान ग्रहण केले आहे, ते सर्व ज्ञान त्यांच्या कृपेने आपल्याला मिळाले आहे. कारण गुरुजन आपल्या प्रिय शिष्याला गुप्त ज्ञानही देतात.
कृपाकरून ते सांगा जेणे कलियुगात या ।
जीवाते सहजी लाभे कल्याण काय तंत्र ते ॥ ९ ॥
महोदय, आपण कृपा करून हे सांगा की, त्यांतून कलियुगात जन्मलेल्या लोकांचे परम कल्याण होईल असे कोणते सोपे साधन आपण निश्चित केले आहे
भूषणे संत जीवांचे, कलीत अल्प आयु ती ।
मंदबुद्धी तसे भाग्य विघ्नांनी बाधिले असे ॥ १० ॥
या कलियुगात आयुष्य बहुतेक कमी झाले आहे. ते आळशी झाले आहेत. त्यांची समजूत यथातथाच आहे. ते अभागी आहेत. शिवाय इतर अनेक प्रकारच्या विघ्नांनी घेरलेले आहेत.
भद्र हो तुमचे सूता यदुवंशात श्रीहरी ।
देवकी वसुदेवाच्या पोटी कां कॄष्ण जन्मला ॥ १२ ॥
सूतमहोदय, आपले कल्याण असो. यदुवंशीयांचे रक्षक भगवान श्रीकृष्ण यांनी वसुदेव-देवकीपासून कशासाठी जन्म घेतला, ते आपण जाणताच.
उत्सुक ऐकण्या आम्ही सांगा ती भगवत् कथा ।
तारण्या जडजीवांना जन्मतो भगवंत तो ॥ १३ ॥
आम्ही ते ऐकू इच्छितो. आपण कृपाकरून त्याचे वर्णन करा. कारण भगवंतांचा अवतार जीवांच्या पालनासाठी आणि समृद्धीसाठी होत असतो.
सारे संसारचक्रात गुंतले जीव ते असे ।
भगवन्नाम ते घेता लाभते मुक्ति निश्चित ॥ १४ ॥
हा जीव जन्म-मृत्यूच्या घोर सापळ्यात अडकला आहे. या स्थितीतही जर त्याने कधी भगवंतांच्या नामाचा उच्चार केला, तर तो त्याच क्षणी मुक्त होतो. कारण स्वतः भय भगवंतांना भिते.
विरक्त शांत जे साधू राहती हरिचिंतनी ।
त्यांचिया स्पर्शने मुक्ति गंगातीर्थ जया परी ॥ १५ ॥
भगवंतांना शरण गेल्यामुळे परम शांत झालेले मुनिजन केवळ स्पर्शानेही जीवांना ताबडतोब पवित्र करतात. त्याऐवजी गंगाजल पुष्कळ दिवस सेवन केल्यानंतरच मग कोठे पवित्र करते.
ज्याची भक्त लिला गाता कलीचे दोष नष्टती ।
इच्छितो आत्मशुद्धी जो न ऐके कोण ही कथा ॥ १६ ॥
असे पुण्यात्मे भक्त ज्यांच्या लीलांचे गुणगान करतात, त्या भगवंतांचे कलियुगाचे दोष हरण करणारे पवित्र यश, ज्याला आत्मशुद्धीची इच्छा आहे, असा कोणता मनुष्य श्रवण करणार नाही ?
लीलाधर हरीला त्या नारदे गायिले असे ।
आम्हा श्रद्धाळुना आता त्यांचे वर्णन सांगणे ॥
ते आपल्या लीलांनीच अवतार धारण करतात. नारदादी महात्मा पुरुषांनी त्यांच्या औदार्यपूर्ण कर्मांचे वर्णन केले आहे. आम्हां श्रद्धाळूंसाठी आपण त्यांचे वर्णन करावे.
योगमाये स्वयें देव लीला स्वच्छंद खेळले ।
मंगला हरिची कीर्ती करा वर्णन ती पुढे ॥
अहो बुद्धिमान सूत, सर्वसमर्थ प्रभू आपल्या योगमायेने स्वच्छंद रीतीने लीला करतात. आपण त्या श्रीहरींच्या मंगलमय अवतारकथांचे आता वर्णन करा
भगवत् पुण्य त्या लीला न हो तृप्ति कधीहि ती ।
रसिकां नूतनो नित्य रसास्वाद पदोपदी ॥
रसज्ञ श्रोत्यांना पावलापावलागणिक भगवंतांच्या लीलांमधून नवनवीन रसांचा अनुभव येत असल्याने त्या ऐकून आमची कधीच तृप्ती होत नाही.
त्यांनी निश्चित केले की श्रेष्ठ भागवतो युगीं ।
श्रवणे पठणे मुक्ती आणि वैकुंठ दायक ॥
भगवान श्रीकृष्णांनी गुप्त राहून मनुष्यरूपाने बलरामासहित असे काही पराक्रमही केले की, जे सामान्य मनुष्य करू शकणार नाही.
कलीचे ज्ञान होताची आम्ही हा यज्ञ मांडिला ।
हरीच्या ऐकण्या लीला वेळ ही योग्य लाभली ॥
कलियुग आले आहे, असे जाणून या वैष्णव क्षेत्रात आम्ही दीर्घकाल चालणार्या सत्राचा संकल्प करून बसलो आहोत. त्यामुळे श्रीहरींची कथा ऐकण्यासाठी आम्हांला पुष्कळ वेळ आहे.
कली हा नष्टितो शुद्धी करीतो शक्तिहीनही ।
यातून पार होण्याला उतारी लाभले तुम्ही ॥
हे कलियुग अंतःकरणातील पवित्रता आणि शक्तीचा नाश करणारे आहे. यातून पार होणे कठीण आहे. ज्याप्रमाणे समुद्र पार करणार्याला नावाडी मिळावा, त्याप्रमाणे कलियुगातून पार पडण्याची इच्छा करण्यार्या आम्हांला ब्रह्मदेवाने आपली भेट घडवून दिली आहे.
व्यासजी सांगतात -
(अनुष्टुप)
प्रश्न ऐकोनि सर्वांचा रोमहर्षणसूत जे ।
उग्रश्रवासि आनंद होताचि बोलले पुढे ॥
श्रीव्यास म्हणतात - शौनकादी ब्रह्मवादी ऋषींचा हा प्रश्न ऐकून रोमहर्षणाचे सुपुत्र उग्रश्रवा यांना फार आनंद झाला. त्यांनी ऋषींच्या या मंगलमय प्रश्नाचे अभिनंदन करून सांगण्यास सुरुवात केली.
संन्यास इच्छुनि शिशू निघता वनाते
पुत्रासि व्यास म्हणता विरहे सुताऽरेऽऽ!
वेली नि वृक्ष वदले प्रति उत्तरा मी
सर्वात्मरूप ! शुकदेव नमी असे मी ॥
कोणतेही लौकिक - वैदिक कर्म कर्तव्य नसल्यामुळे संन्यास घेण्यासाठी एकटेच निघालेल्या ज्यांना वडील व्यास विरहाने व्याकूळ होऊन पुत्रा, पुत्रा, म्हणून हाका मारून लागले. तेव्हा ब्रह्मरूप झालेल्या शुकदेवांशी एकरूप झालेले वृक्षच त्यांच्या वतीने ’ओ’ देऊ लागले. अशा सर्व चराचराच्या हृदयांत विराजमान झालेल्या श्रीशुकमुनींना मी नमस्कार करतो.
हे वेदसार नि तसेचि पुराणसार
कृष्णस्वरूप मिळते अशि गूढ वार्ता ।
अध्यात्मदीप उजळे भगवत्कथेने
वक्ते असे शुक तया नमितो पुन्हा मी ॥ ३ ॥
अत्यंत प्रभावी, सर्व वेदांचे सार असलेले, संसाररूप अंधारातून बाहेर पडू इच्छिणार्यांना आध्यात्मिक प्रकाश देणारे, अद्वितीय रहस्यमय श्रीमद्भागवत पुराण, संसारी लोकांची दया येऊन त्यांच्या उद्धारासाठी ज्यांनी सांगितले, त्या मुनींचे गुरू असण्यार्या व्यासपुत्र श्रीशुकाचार्यांना मी शरण जातो.
नरनारायणो ऐशा थोरांना नमितो पुढे ।
देवी सरस्वती व्यासा जयार्थचि नमो नमो ॥
पुरुष श्रेष्ठ नर-नारायण ऋषींना, सरस्वती देवीला आणि श्रीव्यासदेवांना नमस्कार करून या श्रीमद्भागवताचे पठण करावे.
ऋषिंनो तुम्हि हा प्रश्न उत्तमचि विचारिला ।
कृष्णाच्या या कथे होते आत्मशुद्धि निरंतर ॥
ऋषिवर्य हो ! संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी आपण हा सुंदर प्रश्न विचारला आहे. कारण हा प्रश्न श्रीकृष्णांच्या संबंधात आहे. त्यामुळे अंतःकरण चांगल्या प्रकारे प्रसन्न होते.
0 Comments